सूर्य नमस्कार : माहिती, कृती आणि लाभ

                       🌞   सूर्य नमस्कार   🙏



     सूर्य नमस्कार : - हा एक सर्वांग सुंदर व्यायामप्रकार आहे . या मध्ये बारा स्थिती असतात . ह्या स्थितीमुळे एकाच व्यायामप्रकारात शरीराच्या जवळ जवळ सर्व अवयवांना व्यायाम मिळतो . सूर्यनमस्कारासाठी सूर्योदयाची वेळ ही सर्वात योग्य म्हणून सांगितली गेली आहे . सूर्योदयाच्या वेळची कोवळी किरणे शरीरावर पडणे आवश्यक असते . आजकालच्या फ्लॅट पद्धतीमध्ये ते शक्य नाही , निदान एक वेळ तरी शक्य असेल तर पाळायला हरकत नाही . सूर्यनमस्काराच्या बारा स्थितीमध्ये पहिली आणि बारावी स्थिती ही नमस्काराची स्थिती आहे . पण मधल्या १० स्थिती ह्या दहा आसने आहेत . निरोगी माणसाने कमीतकमी १२ सूर्यनमस्कार करणे अपेक्षित आहे . फक्त पहिल्या दिवशी शक्य नसल्यास तीनच सूर्यनमस्कार करावेत . हळूहळू संख्या वाढवत न्यावी .

          सूर्यनमस्कार करताना प्रत्येक नमस्काराबरोबर सूर्याचे एक नाव घेऊन सूर्यनमस्कार घालावा . सूर्यनाम : - १ ) ॐ मित्राय नमः २ ) ॐ रवये नमः ३ ) ॐ सूर्याय नमः ४ ) ॐ मानवे नमः ५ ) ॐ खगाय नमः ६ ) ॐ पुण्णे नमः ७ ) ॐ हिरण्यगर्भाय नमः ८ ) ॐ मरिचये नमः ९ ) ॐ आदित्याय नमः १० ) ॐ सावित्रे नमः ११ ) ॐ अर्काय नमः १२ ) ॐ भास्कराय नमः

         दहा वर्षानंतरच्या कुठल्याही वयाच्या व्यक्ती सूर्यनमस्कार घालू शकतात . फक्त हाडाचे , पोटाचे विकार , रक्तदाब , हृदयविकार असतील तर अशा व्यक्तींनी सूर्यनमस्कार घालू नयेत . स्त्रीयांनी मासिक पाळीच्य दिवसांमध्ये सूर्यनमस्कार घालू नयेत . गरोदरपणात घालू नयेत . सूर्यनमस्काराच्या प्रत्येक आसनाच्या श्वासावर नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे . पुरक , कुंभक , रेचक कधी करायचा हे व्यवस्थित शिकून  घयावे .


 कृती : -

  १] सर्व प्रथम सरळ उभे रहा . दोन्ही पायात ४५ चा कोन असावा . दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांना चिकटवून सरळ ठेवावेत . नंतर सूर्यनमस्काराला सुरुवात करताना दोन्ही हात नमस्कार स्थितीत छातीजवळ आणावेत . 
२] दुसऱ्या स्थितीमध्ये श्वास छातीमध्ये भरत दोन्ही हात वर नेऊन शरीराला मागे बाक द्यावा व हाताला मागच्या बाजूला ताणावे . ह्या स्थितीत दोन्ही दंड कानाला चिकटलेले असावेत व हात ताठ असावेत . नंतर 
३] श्वास सोडत दोन्ही हात पुढे आणावेत व कमरेतून पुढे वाकत दोन्ही हात दोन्ही पायांच्या बाजूला जमिनीवर टेकावेत . सुरुवातीला ते जमिनीला टेकत नाहीत . पण जेवढे जमेल तेवढे खाली वाकावे . यावेळी कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा . फक्त या स्थितीमध्ये गुडघे ताठ असणे आवश्यक आहे . गुडघे वाकवून हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करु नका .
४] ह्यानंतर हात जमिनीवर टेकल्याच्या स्थितीत ठेवून श्वास घेऊन डावा पाय मागे न्यावा . यावेळेस उजवा पाय दुमडलेल्या अवस्थेत येईल . यावेळी मानेला थोडा ताण देऊन समोर बघता येईल तेवढे बघायचा प्रयत्न करा .
 ५] श्वास आत रोखून ठेवून उजवा पाय मागे न्यावा . दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले असतील . हात ताठ ठेवून डोके व शरीराचा सर्व भाग उचललेल्या स्थितीत असेल . या वेळेला श्वास सोडून द्यावा वपरत आत घ्यावा . 
६] नंतर कपाळ , छाती व गुडघे जमिनीला टेकावेत व नितंबाचा भाग जेवढा शक्य असेल तेवढा उचला व श्वास या वेळेस रोखून धरावा . नंतर श्वास सोडून द्यावा आणि सर्व शरीर जमिनीवर ठेवावे .
७] नंतर श्वास घेत कमरेपर्यंत भाग उचलावा व हात ताठ होतील एवढा वर न्यावा . 
८] नंतर पायाचे चवडे व तळहात तसेच जमिनीवर ठेवून कमरेचा भाग शक्य तेवढा वर उचलावा . हात आणि पाय यावेळेला ताठ असावेत . यावेळेस श्वास हळूहळू सोडावा .
९]  नंतर श्वास घेत उजवा पाय परत पुढे आणावा .
१०]  नंतर डावा पाय पुढे घेऊन श्वास घेत उभे रहावे व 
११] दोन्ही हात सुरुवातीला केलेल्या कृतीप्रमाणे शरीर कमरेत मागच्या बाजूला वाकवून मागे सरळ न्यावे .
१२]  नंतर श्वास सोडत परत हात नमस्कार स्थितीत आणावे . हा एक सूर्यनमस्कार पूर्ण झाला . 

लाभ :  सूर्यनमस्कार हा एक सर्वांगिण व्यायाम आहे . त्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तसंचार सुधारतो . रक्ताभिसरण सुधारते , स्नायू मजबूत व लवचिक होतात . शरीराची अनावश्यक जाडी कमी होऊन शरीराला सुडौल आकार प्राप्त होतो . मेरुदंडाला लवचिक करुन पाठीच्या , कमरेच्या , मानेच्या दुखण्यापासून लांब रहाता येते . सूर्यनमस्कारामध्ये श्वासावर नियंत्रण असल्याने हृदय व फुफ्फुसेही निरोगी होतात . मेंदूलाही शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो . त्यामुळे मानसिक व मेंदूशी संबंधीत रोगांपासून मुक्ती मिळवता येते . त्वचेवर कांती व झळाळी येते.सूर्यनमस्कारामध्ये वेगवेगळी आसने आपोआप होतात . त्यामुळे शरीराच्या सर्व सांध्यांना व स्नायूंना व्यायाम होतो . तसेच विजातीय पदार्थांचा निचरा होऊन शरीर व्याधीमुक्त होते . थोडक्यात काय की संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारते .



धन्यवाद..... 🙏

Comments